गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे.
चंद्रपूर व ब्रम्हपुरी मधील जमिनदारी व मालमत्तेचे हस्तांतरण करून गडचिरोली तहसील म्हणून १९०५ पासून अस्तित्वात होती. ब्रम्हपुरी ऐवजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात मोडतो. फार प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्र्कुट यांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य, देवगीरीचे यादव यांचे साम्राज्य होते. यानंतर गडचिरोलीच्या गोंड राजांनी राज्य केले. तेराव्या शतकात, खन्डक्या बल्लाळ शाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली. याचकाळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला. १८५३ मध्ये, बेरार हा चंद्रपूर (पूर्वीचे चांदा ) प्रदेशाचा भाग ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी च्या ताब्यात आला. १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशाचा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. ब्रिटीशांनी १९०५ मध्ये चंद्रपूर व ब्राम्ह्पुरीची जमिनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तहसीलची निर्मिती केली. राज्याची पुनर्ररचना होण्यापुर्वी हा भाग १९५६ पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्यपुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेट मध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६० मध्ये केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याची स्थापना करून त्यामध्ये चंद्रपूर हे जिल्हा म्हणून समाविष्ट करण्यात आले. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रम्हपुरी ऐवजी स्वतंत्र गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला.